औरंगाबाद शहराच्या नामातरांचा वाद हळूहळू वाढू लागला आहे. त्यातच आता भाजपचे नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी तर थेट या मुद्द्यावरून शिवसेनेच्या भूमिकेवरच शंका घेतली आहे. ‘नामांतराच्या बाबतीत शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे,’ असा थेट आरोपच महाजन यांनी नगरमध्ये बोलताना केला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजन नगर येथे आले असता, त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका करताना महाजन म्हणाले, 'शिवसेनेला सध्या कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपदी राहायचे आहे. त्यासाठी त्यांना सर्व पक्षांना सोबत घेऊन जायचे आहे. त्यामुळेच बोलायचे एक आणि करायचे दुसरे, ही भूमिका शिवसेनेची आहे. औरंगाबाद येथील आगामी निवडणुका समोर ठेवत मतदारांना कशा भूलथापा मारायच्या, त्यांना कशी भुरळ टाकायची, त्यासाठी हा सर्व प्रयत्न चालवला आहे. शिवसेनेकडे राज्यातील सत्ता आहे, त्यांचे मुख्यमंत्री आहेत. आता त्यांनी औरंगाबादचे नामांतरण संभाजीनगर करण्याबाबत निर्णय घ्यावा, त्याला आमचा पाठिंबा असेल. मात्र शिवसेना दाखवते वेगळे आणि करायचे काहीच नाही, असे काम करते. औरंगाबाद नामांतराचा बाबतीत देखील त्यांची भूमिका ही दुटप्पी अशीच आहे. औरंगाबादचे स्थानिक लोक शिवसेनेवर चिडले असून नाराज आहेत. कारण त्यांच्याकडे सत्ता असली तरी तेथे आठ आठ दिवस लोकांना पाणी येत नाही. त्यामुळेच केवळ आता लोकांना भुरळ टाकण्यासाठी शिवसेनेने नामांतराचा मुद्दा काढला आहे.'
|
टिप्पणी पोस्ट करा