अयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारण्यासाठी सर्वसामान्य लोकांचापण सहभाग, सुरु झाले अभियान.

           अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी राम भक्तांचा सहभाग घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या विनंतीवरून नगर जिल्ह्यामध्ये निधी संकलनाचे काम हाती घेण्यात आले आहे,'अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संयुक्त मंत्री दादाजी वेदक यांनी दिली. ते आज नगर मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
          त्यांनी पुढे सांगितले की, 'श्रीराम मंदिर उभारणीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.प्रत्येक व्यक्तीचा राम मंदिर उभारणीमध्ये सहभागी व्हावा, या उद्देशाने दिनांक १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीमध्ये निधी समर्पण अभियानाचा कार्यक्रम देशभर हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून देशातील चार लाख गावांपर्यंत तसेच ११ कोटी कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यानिमित्ताने नगर दक्षिणेतील ८३२ गावांमधील ४ लाख कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा संकल्प सुद्धा करण्यात आलेला आहे. राम जन्मभूमी तीर्थ न्यासाच्या वतीने पावती पुस्तके छापण्यात आली असून यामध्ये एक हजार रुपये, शंभर रुपये आणि दहा रुपये रक्कमची पावती आहेत. याशिवाय ऑनलाईन पद्धतीने सुद्धा निधी संकलन केले जाणार आहे,'असेही त्यांनी सांगितले.
          'नगर जिल्ह्यातील दहा हजार रामभक्त कार्यकर्ते पूर्णवेळ या निधी संकलन अभियानाचे लक्ष्य गाठण्यासाठी कार्यरत राहणार आहेत. नगर शहरात एक लाखाच्या पुढे निधी देणाऱ्यांची हजाराच्या पुढे नावे काढण्यात आले आहे. तसेच दहा लाखाच्या पुढे देणगी देणाऱ्यांची नावे सुद्धा काढलेली आहे. सर्व पदाधिकारी त्यांच्याकडे जाऊन देणगी मागणार आहेत. दोन हजाराच्या पुढे देणगी देणाऱ्यांना आयकरात सूट मिळणार आहे,'अशी माहितीही त्यांनी दिली. 'निधी संकलन करताना आम्ही गावातील प्रत्येक कुटुंबाकडे जाणार आहोत. त्यांनी स्व-इच्छेने आम्हाला निधी दिला तरच आम्ही तो स्वीकारणार आहोत, असेही दादा वेदक यांनी स्पष्ट केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने