'हे' खासदार लिहिणार संरक्षण मंत्र्यांना पत्र, कारण वाचाच

           आज शिवसेना नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह काही व्हीआरडीई मधील कर्मचारी मला भेटले आहेत. त्यांच्याकडून मी हा प्रश्न समजून घेतला आहे. या संदर्भात मी आजच देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहीत आहे. हे केंद्र येथून हलू नये, ही माझी मागणी आहे. त्यासाठी दिल्लीत भाजपचे जे नेते आहेत, त्यांचाही सहभाग घेऊ व राजकीय पक्षभेद बाजुला ठेवून हे केंद्र नगर जिल्ह्यातच राहील अशी भूमिका घेऊ,' असे स्पष्ट मत शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मांडले.
          नगर येथील लष्कराच्या व्हीआरडीई या संस्थेचे स्थलांतर होणार असल्याची चर्चा आहे. त्याबाबत आज व्हीआरडीई येथील काही कर्मचारी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांना भेटले. त्यानंतर पत्रकारांशी लोखंडे बोलत होते. यावेळी लोखंडे यांनी शिर्डीच्या मंदिर परिसरात लावलेल्या ड्रेसकोड बाबतच्या बोर्डवर देखील भाष्य केले. ते म्हणाले, 'शिर्डी येथील मंदिर प्रवेशद्वारावर ड्रेस कोड बाबत जो बोर्ड लावला आहे, त्याची भाविकांना सक्ती नाही. मात्र भारतीय पद्धतीने राहावे ही भूमिका मंदिर प्रशासनाची व सरकारची आहे. त्यामुळे ड्रेस कोडला विरोध करणे चुकीचे आहे. मंदिर परिसरात ड्रेसकोड हा सक्तीचा नाही. पण हिंदू संस्कृतीनुसार राहावे ही भावना लक्षात घेता ड्रेसकोडला विरोध करण्याचा कुठलाच विषय येत नाही. हे जे विरोध करत आहेत, ती चुकीची पद्धत आहे.
           लोखंडे यांनी यावेळी औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरही आपले मत मांडले. ते म्हणाले, 'औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी ही आमची अनेक दिवसाची असून ती पूर्ण झाली पाहिजे, या मताचा मी आहे.'

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने