शेतकरी आंदोलन : भाजपच्या माजी मंत्र्याने काँग्रेसवर डागली तोफ

           ‘दिल्लीचे आंदोलन म्हणजे शेतकरी बाजुला राहिले, व त्यामध्ये राजकारण जास्त झाले आहे. काँग्रेस, डावे पक्ष, कम्युनिस्ट यांचा या आंदोलनात सर्वात जास्त शिरकाव झाला असून त्यांना हा प्रश्न संपवायचा नाही. जाणीवपूर्वक आंदोलनाला हवा द्यायची, हा विषय पेटत ठेवायचा, संपूच द्यायचा नाही, हा एक राजकीय षडयंत्राचा भाग आहे,’ असा गंभीर आरोप भाजप नेते माजी मंत्री डॉ.गिरीष महाजन यांनी केला.
           सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी महाजन हे नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत आपले मत मांडताना काँग्रेसवर तोफ डागली.
           याप्रसंगी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र उर्फ भैय्या गंधे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, सुनील रामदासी, सचिन पारखी आदी उपस्थित होते.
           ‘कृषी बील जे मंजूर झाले, ते किती शेतकरी व देशाच्या हिताचे आहे, याची कल्पना सर्वांना आहे,’ असे सांगतानाच डॉ.महाजन म्हणाले, ‘पंजाब व हरियाणा सोडला तर संपूर्ण देशात या बिलाचे स्वागत झाले. जे सर्व कृषी तज्ज्ञ आहेत, त्याच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर हे बील सर्व हिताचे आहे. कृषी बिलाचा जो निर्णय आहे, तो शेतकरी व देशाच्या हिताचा आहे. पण लोकांना खोट्या चिथावणी देण्याचे काम दिल्लीत चालले आहे. काँग्रेसच्या मागे आता जनाधार राहिलेला नाही. कुठेतरी एकडे तिकडे घुसून पाठिंबा देऊन चिथावणी द्यायचे, असे उपद्रव त्यांचे चालू आहेत,’ असा गंभीर आरोपही यावेळी महाजन यांनी केला.
           एकला चलो रे...
           ‘ग्रामपंचायतच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी व माहिती घेण्यासाठी मी नगरला आलो आहे. आता या निवडणुकीत आम्ही एकटेच असून ‘एकला चलो रे’ असे आमचे नियोजन आहे,’ अशी माहितीही यावेळी माजी मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. ‘शिवसेना आमचा मित्र पक्ष होता. लोकसभेला सोबत लढले. केंद्रात मंत्रीपद भूषवली. राज्यामध्ये सुद्धा आम्ही विधानसभेला एकत्र लढलो, आम्ही १०५ जागेवर निवडून आलो, ते ५५ आले. आमच्यापेक्षा निम्मेच आले. परंतु निवडणुकीच्या निकालानंतर सर्व आकडेवारी बघून त्यांचे विचार बदलले, व शिवसेनेने सर्व मुल्यांच्या बाहेर जात काँग्रेस व राष्ट्रवादी यांना सोबत घेतले. पण आम्ही आमच्या विचारासोबत पक्के आहोत,’ असे सांगतानाच महाजन यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने