रेखा जरे यांची गळा चिरून मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात हत्या झाली होती. या घटनेला ९० दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप या हत्याकांडाचा मास्टरमाईंड बाळ बोठे फरार आहे. त्यास अटक करण्यात यावी, या मागणीसाठी रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने आज, शुक्रवारी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला भूमाता ब्रिगेडने देखील पाठिंबा दिला आहे.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मास्टरमाईंड बाळ बोठेला अटक करावी, व त्याची मालमत्ता जप्तीचे आदेश देण्यात यावेत,’ अशी मागणीच भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे. ‘बोठे याला सहकार्य करणारे जे कोणी असतील त्यांनाही ताब्यात घेण्यात यावे,’ असेही देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
‘नगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची तीन महिन्यापूर्वी गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचा सूत्रधार बाळ बोठे याला अजुनही पोलिसांनी अटक केली नाही,’ असे सांगतानाच देसाई पुढे म्हणाल्या, ‘न्याय मिळावा या मागणीसाठी रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे व त्यांचे कुटुंबिय आज उपोषणाला नगरमध्ये बसले आहेत. या उपोषणाला भूमाता ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा आहे. तातडीने बाळ बोठेला अटक करावी, त्याची मालमत्ता जप्तीचे आदेश देण्यात यावेत,’ अशी मागणीही देसाई यांनी केली आहे. |
टिप्पणी पोस्ट करा