काँग्रेसच्या मा. मुख्यमंत्र्याची खंत

           'काँग्रेस पक्षात पूर्वी वैचारिक शिबिरे व्हायची, ज्यातून चुकलेल्या कार्यकर्त्याला दिशा मिळायची. म्हणजे १९७४-७५च्या काळात काँग्रेसमार्फत वैचारिक शिबिरे भरवली जात होती. त्यामध्ये चुकीच्या धोरणांमध्ये सुधारणा केली जात असे. मात्र, सध्या तसे घडत नाही. काँग्रेस पक्षाने आता आम्ही नक्की कुठे आहोत, हे पाहणं अवघड झालं आहे,' असं म्हणत काँग्रेसची वैचारिक परंपरा संपत चालल्याची खंत सुशीलकुमार शिंदे यांनी इंदापूर येथे व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याची राज्यभर जोरदार चर्चा रंगत आहे.
          राज्य नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रवक्ते डॉ.रत्नाकर महाजन यांच्या अमृत महोत्सवानिमित्त इंदापुरात त्यांचा नागरी सत्कार माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. हा सोहळा इंदापूर तालुका पत्रकार संघ आणि राज्य वृत्तवाहिनी संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते आणि माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील हे होते.

           या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी रत्नाकर महाजन यांच्या कार्याचा गौरव केला. राज्यसभेसाठी महाजन यांच्यासाठी हायकमांडकडे शब्द टाकू पण त्या शब्दाला किती किंमत राहिली हे माहीत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आता काँग्रेसमधील परीस्थिती बाबत सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने नाराजी व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिंदे यांच्या या वक्तव्याबाबत आता काँग्रेसमध्ये काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने