महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 136 जणांचा मृत्यू तर 45 बेपत्ता.

           महाराष्ट्र राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती (Flood) निर्माण झाली आहे. या काळात झालेल्या दुर्घटनांमध्ये अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. या संदर्भातील राज्य सरकारने जी आकडेवारी दिली आहे ती नक्कीच धक्कादायक आहे. राज्यात आतापर्यंत तब्बल 136 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली.
           राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जून ते 23 जुलै 2021 या कालावधीत 136 नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि त्यामुळे उद्भवलेल्या इतर घटनांत या नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. तर अद्याप 45 नागरिक हे बेपत्ता आहेत. तसेच या कालावधीत 70 नागरिक जखमी झाले आहेत. तर 38 जनावरे दगावली आहेत. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीत बचावकार्य करुन 1200 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
           ही आकडेवारी महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांतील आहे. तसेच रत्नागिरी, रायगड येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांत अद्यापही काही नागरिक बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत राज्य सरकारकडून जी नव्याने आकडेवारी जाहीर करण्यात येईल त्यात मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने