महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण आणि खेड शहरांमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे मदतीची गरज असल्याचा संदेश भारतीय वायुदलाला दि. 22 जुलै 2021 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मिळाला. हवामान काहीसे अनुकूल होताच दुपारी 3:40 वाजता एमआय-17 IV प्रकारचे एक हेलिकॉप्टर मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने झेपावले आणि 5 वाजता रत्नागिरीत उतरले. मात्र खराब हवामानामुळे संध्याकाळपर्यंत मदतकार्यासाठी कोणतीही हालचाल करता आली नाही.
रत्नागिरीत पाठवलेल्या हेलिकॉप्टरच्या सहकार्यासाठी मुंबईहून आणखी एक हेलिकॉप्टर पाठवण्यात आले असून, दोन्हींच्या साहाय्याने आज मदतकार्याला पुन्हा सुरुवात झाली. एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 10 जवानांच्या पथकासह सुमारे एक टन वजनाची सामग्रीही भारतीय वायुदलाने रत्नागिरीला पाठवली आहे.
२३ जून रोजी सकाळी 11:35 वाजता रत्नागिरीहून एका हेलिकॉप्टरने उड्डाण केले, मदत्कार्याच्या दृष्टीने परिसराचे सर्वेक्षण करून व रत्नागिरीत परतण्यापूर्वी या हेलिकॉप्टरने दोन व्यक्तींची सुखरूप सुटका केली. याखेरीज, भारतीय वायुदल पूरस्थितीतील मदतकार्यासाठी दोन एमआय-17V5 आणि दोन एमआय-17 पाठवत आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीची गरज उद्भवली असता, पुण्यात आणखी एक हेलिकॉप्टर मदतीसाठी तयार ठेवण्यात आले आहे.
अतिवृष्टी आणि त्यामुळे विविध नद्यांची वाढलेली पातळी यामुळे अनेक राज्यांतील बर्याच भागांमध्ये पुराचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांचा पुराचा तडाखा बसला आहे. नागरी प्रशासनाच्या विनंतीनुसार भारतीय लष्कराने पूरग्रस्त भागांमध्ये स्थानिक प्रशासनास मदत करण्यासाठी मदत आणि बचाव पथके तैनात केली आहेत.
औंध लष्करी तळ आणि पुण्यातील बॉम्बे इंजिनिअर समूहाची एकूण 15 मदत आणि बचाव पथके रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरग्रस्त भागात रात्री तैनात करण्यात आली होती. ही पथके परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत पाण्याखाली गेलेल्या भागात अडकलेल्याची सुटका करण्यात नागरी प्रशासनाला मदत करणार आहेत. दक्षिणी कमांडचे जीओसी-इन-सी लेफ्टनंट जनरल जेएस नैन यांनी सांगितले की भारतीय लष्कर या संकटाच्या काळात लोकांच्या पाठीशी आहे आणि सैन्याकडून सर्व मदत पुरवली जाईल. पूरग्रस्त भागातून हलविण्यात येणाऱ्या स्थानिकांना आवश्यक ते प्राथमिक उपचार आणि औषधे पुरविण्यासाठी मदत पथकांमध्ये अभियंते आणि लष्करातील वैद्यकीय पथकाचा समावेश आहे.
|
टिप्पणी पोस्ट करा