वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचं बॅंक खातं गोठवण्यात आलंय. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने भविष्य निर्वाह निधी म्हणजे पीएफची रक्कम न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबादच्या ईपीएफओ (EPFO) कार्यालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
ईपीएफओ कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे तब्बल 1 कोटी 46 लाख रूपये थकवले होते. त्यामुळे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडून थकबाकी वसूल करण्यासाठी ही कारवाई करण्यात आलीय. सध्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचं अकाउंट सील करून 92 लाख रूपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. उर्वरीत 56 लाख रूपयांची थकबाकी वसूल करण्याचं काम सुरू आहे.
ईपीएफओ कार्यालयाच्या माहितीनुसार, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 या काळात कर्मचारी आणि कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची 1 कोटी 46 लाख रूपयांची थकबाकी होती. पीएफचे पैसे भरण्यासाठी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस बजावण्यात आली होती. पण, या नोटीशीनंतरही कर्मचाऱ्यांचा पीएफ न भरण्यात आल्याने खातं गोठवण्याची कारवाई करण्यात आली. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आहे.
पगार न मिळाल्याने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील 700 कामगारांनी गेल्यावर्षी मार्च महिन्यात संप पुकारला होता. पगार मिळण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी गेल्यावर्षी विधीमंडळ अधिवेशावेळी आंदोलनही केलं होतं. पंकजा मुंडे या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आहेत. ईपीएफओने केलेली कारवाई पंकजा मुंडे यांच्यासाठी धक्का मानला जातोय.
|
टिप्पणी पोस्ट करा