मुंबईतील लोकल सेवा तातडीनं सुरू करा राज यांचे उद्धव यांना पत्र.

           लोकल बंदीमुळं हैराण झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांच्या संतापाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता वाचा फोडली आहे. राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं असून मुंबईतील लोकल सेवा तातडीनं सुरू करण्याची मागणी केली आहे. 'सर्वसामान्यांनी आतापर्यंत खूप सहन केलं, आता सहन करण्याची क्षमता संपत चालली आहे,' असा इशाराही राज यांनी पत्रातून दिला आहे. राज ठाकरे यांचं पत्र त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून शेअर करण्यात आलं आहे.
           मुंबईतील लोकल सेवा तातडीनं सुरू करण्यासाठी सरकारनं पावलं उचलायला हवीत. लोकांनी आतापर्यंत खूप सहन केलंय आता सहन करण्याची क्षमता संपत चालली आहे. यापुढं सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत मनसे मुंबईकरांसोबत उभी राहील आणि लोकल सुरू करण्यासाठी आंदोलन करेल,' असं राज यांनी म्हटलं आहे. 'मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा, निदान लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी तातडीनं सुरू करा,' अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
           'ही साथ एकाएकी जाणार नाही हे गृहित धरून आता सरकारनं उपाययोजना व धोरणा आखण्याची गरज आहे. लसीकरणाचा वेग वाढवतानाच धोरण आखण्यात अधिक कल्पकता असणं गरजेचं आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारला टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलीकडं काही सुचतच नाही अशी स्थिती आहे,' असेही राज यांनी पत्रात म्हंटले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने