. नैसर्गिक अपत्तीच्या काळात आम्ही हात द्यायला तयार आहोत, पण सरकारचा हात तर दिसू द्या. सध्या राज्यात पूर परिस्थिती गंभीर बनली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून आहेत, त्यांचे मंत्रीही कोठे मदतीला धावले दिसत नाहीत. आम्हाला मात्र राजकारण करू नका म्हणतात,’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ()
आज नगर मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळेस राज्यातील पूरस्थितीसंबंधी विचारले असता ते म्हणाले, "दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर, सातारा, सांगली भागात गंभीर पूर परिस्थती बनली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, मी महसूलमंत्री होतो. त्यावेळी आम्ही ४ लाख ७३ हजार लोकांना पुरातून बाहेर काढले होते. सुमारे पंधरा दिवस त्यांची निवारा, अन्न आणि जनावरांच्या चाऱ्याची सोय केली होती. तरीही काँग्रेसने आमच्यावर टीका केली. आताही पूरस्थिती गंभीर बनली आहे. तरीही ठाकरे घरातच बसून आहेत."
ते पुढे म्हणाले "त्यांचे मंत्रीही मदतीला गेलेले नाहीत. अशा वेळी त्यांनी तेथे पूरग्रस्त भागात तळ ठोकून बसायला पाहिजे. आवश्यक ती मदत करायला हवी. पटापट निर्णय घेऊन परिपत्रके काढली पाहिजेत. त्यावेळी ही कामे फडणवीस यांनी वेगाने केली होती. आम्ही काही बोललो तर राजकारण करून नका म्हणतात. अशा काळात विरोधकांनी सरकारच्या हातात देऊन काम केले पाहिजे हे खरे आहे. पण त्यासाठी सरकारचे हात तर दिसला पाहिजे. मंत्र्यांनी बाहेर पडावे, चिपळूनला जावे, तेथे मदतीची गरज आहे. ते सोडून केवळ दादागिरीची भाषा करीत आहेत. सरकार चालवितात की पक्ष. कोल्हापूर जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. पण काहीही कामाचे नाहीत. करोनाच्या काळातही त्यांना दिलासादायक काम करता आले नाही. आता पुरातही त्यांचे काम दिसत नाही. कोल्हापूरकरांचे हाल सुरूच आहेत. मंत्री झोपा काढत आहेत का? राजकारण करू नका म्हणता तर मग तुम्ही जे करता ते आम्ही केवळ पहात राहायचे का? दरवेळी मदतीचा विषय आला की केंद्र सरकारकडे बोट दाखवायचे. राज्याची तिजोरी मात्र, उघडायची नाही, असा प्रकार सुरू आहे." असे पाटील म्हणाले.
|
टिप्पणी पोस्ट करा