कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या सह काही वारकरी पोलिसांच्या ताब्यात.

           गेल्या वर्षांपासुन करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीला सरकारने परवानगी नाकारली आहे. मात्र विठ्ठल भक्तीचा भुकेला वारकरी याची पायी वारी साठीची तगमग त्याला शांत बसु देत नाही, यामुळे सरकारच्या या निर्णयावर वारकर्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच भारतीय जनता पक्षानं पायी वारी व्हायला हवी, अशी भूमिका घेतली होती. त्याला बऱ्याच वारकऱ्यांनी पाठिंबा दिला होता. यातच आज वारीसाठी पायी चालत पंढरीकडे निघालेले कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्यासह काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
           राज्यातील करोनाचा धोक्याच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी महाराष्ट्र सरकारनं नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, पायी वारीला मनाई करताना मानाच्या पालख्या एसटीनं बसनं पंढरपूरला नेण्याची परवानगी दिली आहे. सरकारचा हा निर्णय धुडकावून लावत कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्यासह काही वारकऱ्यांनी पायी वारी करण्याची भूमिका घेतली होती. त्यानुसार, आज कराडकर यांनी आपल्या समर्थकांसह पायी वारी सुरू केली. पोलिसांनी लगेचच त्यांना ताब्यात घेतले व त्यांनां दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आलं आहे.
           बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं भाजप संतापला आहे. भाजपच्या आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला असून सरकारला इशारा दिला आहे. 'मुघलांनी सुद्धा वारकऱ्यांचे इतके हाल केले नव्हते. भागवत धर्माची भगवी पताका घेऊन जाणाऱ्या बंडातात्या आणि वारकऱ्यांना अटक करणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?' असा सवाल भोसले यांनी केला आहे. तसेच सरकारला याचे परीणाम भोगावे लागतील, असा इशारा देखील दिला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने