भेटीमागे दडलंय काय ?, PM मोदी-पवार भेट

           आज शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला पोहचल्याने सर्वांचेच लक्ष या भेटीकडे लागले. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. दिल्लीत रवाना होण्यापूर्वी शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. त्यामुळे मोदी-पवार भेटीतून राज्यात नवी समीकरणे तयार होत आहेत का, असेही विचारले जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून या सर्व शक्यता फेटाळून लावण्यात आल्या आहेत.
           सहकारी बँकिंग क्षेत्राची सद्यस्थिती हे शरद पवारांच्या मोदीभेटीचे प्रमुख कारण असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. देशभरातील सहकारी बँकांची अनेक गाऱ्हाणी आली आहेत. त्याचा विचार करता यात केंद्र सरकारने लक्ष घालावे आणि रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या जाव्यात अशी विनंती करण्यासाठी शरद पवार हे पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेले होते, असे पाटील यांनी नमूद केले. याशिवाय शरद पवार यांनी देशाचे संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिलेले आहे. कालच सरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शरद पवार व ए. के. अँटनी यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यामुळे संरक्षणाच्या मुद्द्यावरही पवारांनी मोदींशी चर्चा केली असावी, असे पाटील यांनी सांगितले. आजच्या भेटीचा नेमका तपशील माझ्याकडे नसला तरी देशहिताच्या काही प्रमुख विषयांवर पंतप्रधानांशी चर्चा करणार असल्याचे पवारांनी सांगितले होते, असेही पाटील यांनी पुढे स्पष्ट केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने