महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील करोनाची स्थिती सुधारत आहे. त्यामुळे हळुहळु निर्बंध शिथील करण्यास सुरुवात झाली आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी याबाबत फेसबुक लाइव्ह मध्ये तसे संकेत दिले आहेत. पंधरा ऑगस्टनंतर अनेक ठिकाणी बऱ्याच सवलती मिळण्याची शक्यता आहे. परंतु मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर कौतुक झालेल्या अहमदनगर जिल्ह्याची आता काळजी वाटू लागली आहे. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रविवारी रात्री फेसबुक लाइव्हतून राज्याला संबोधित करताना काही जिल्ह्यांबद्दल काळजी व्यक्त केली, त्यात अहमदनगरचा समावेश आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी रात्री राज्याला संबोधित करताना पुणे, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड या जिल्ह्यांमध्ये आजही काळजी घेण्याची गरज असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आत बऱ्याच ठिकाणी नव्याने काही सवलती मिळाल्या तरी त्या या जिल्ह्यांत लागू होण्या बाबत साशंकता आहे.
२० मे रोजी पंतप्रधान मोदी यांनी देशातील ११ राज्यांतील काही जिल्ह्यांची आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये अहमदनगरचा समावेश होता. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. आदर्श गाव हिवरे बाजारने राबविलेल्या पॅटर्नचीही त्यांनी माहिती दिली. त्यावेळी नगरमधील करोनाची स्थितीही सुधारताना दिसत होती. त्यामुळे जिल्ह्यातील कामाचे कौतुक झाले होते, स्वत: मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून कौतुक केले होते. मे महिन्यातील कौतुकजन्य परिस्थिती नंतर जून महिन्यात परिस्थिती उत्तम होती, परंतु जुलैपासून परिस्थिती बिघडत गेली. आता दैनंदिन रुग्ण संख्या ७०० ते ८०० च्या दरम्यान आहे. अलीकडे त्यात किंचित सुधारणा होत आहे.
|
टिप्पणी पोस्ट करा