विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांनासाठी दीर्घकालीन उपाययोजनां कराव्या यासह विविध मागण्या करणारे पत्र रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले. यात पूरग्रस्तांना भरीव आर्थिक मदत, सवलतीचे कर्ज, शेतकऱ्यांना वीजबिल माफी, कोकणासाठी स्वतंत्र आपत्ती निवारण यंत्रणा यासह तातडीच्या उपाययोजना कराव्या असे म्हटले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सुमारे २६ ठिकाणी भेटी देऊन पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठविले. यात पिकांच्या नुकसानीचे पैसे तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावेत. जनावरांच्या मृत्यूंची पशुधनभरपाई तातडीने देण्यात यावी. कोकणात मासेमारांना तातडीने मदत करण्यात यावी, अशा मागण्या केल्या आहेत.
तसेच दुकानदारांना मदत करण्याची तरतूद नसताना २०१९च्या पुराच्या वेळी भाजप सरकारने ती प्रथम केली याचा उल्लेख करून. या पुरात त्यांचे झालेले नुकसान पाहता दुकानदारांना मदत करण्यात यावी. याप्रमाणेच मूर्तिकार यांच्यासाठी स्वतंत्र मदतीची योजना तयार करण्यात यावी. तसेच टपरीधारक/हातगाडीधारक अशाही घटकांचा विचार करण्यात यावा. नागरिकांना त्यांची वाहून गेलेली कागदपत्रे तयार करून देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी. घरांच्या दुरुस्तीसाठी, बांधकामासाठी वाळू, मुरूम मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
भूगर्भ शास्त्रज्ञांच्या माध्यमातून अभ्यास करून धोकादायक गावांचे आरेखन करण्यात यावे. दरडीनजीक असलेल्या राज्यातील सर्व गावकऱ्यांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे. पुराचे पाणी वळण बंधाऱ्यांच्या (डायव्हर्जन कॅनाल) तसेच बोगद्यांच्या माध्यमातून दुष्काळी भागात नेण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसह अनेक उपाययोजनांची आखणी आमच्या सरकारच्या काळात करण्यात आली. त्याला गती देण्यात यावी. कोयनानगर येथील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे आदी मागण्या फडणवीस यांनी केल्या असून सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावून विचारविनिमय करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
|
टिप्पणी पोस्ट करा