भारतीय आधार प्राधिकरण करणार “आधार हॅकेथॉन”चे आयोजन.

भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे झाल्यानिमित्त या वर्षी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याची हाक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिली आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अभिनव संशोधने साजरा करण्याचे आणि सेवा वितरणाचा दर्जा आणखी उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचे हे वर्ष आहे. आधार प्राधिकरणासाठी देखील हे महत्त्वाचे वर्ष आहे कारण आधार प्रणाली अस्तित्वात आल्यापासून आता ती दुसऱ्या दशकात प्रवेश करीत आहे आणि प्राधिकरणाकडून दिल्या जाणाऱ्या विविध सेवा आणि निवासपुरावा विषयक सेवा आणखी उत्तम रीतीने वितरीत करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे.
           हा स्मरणीय प्रसंग साजरा करण्यासाठी भारतीय आधार प्राधिकरणाने अजूनही विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आणि वास्तव जगात पाऊल ठेवण्यासाठी उत्सुक असलेल्या युवा संशोधकांवर लक्ष केंद्रित करून “आधार हॅकेथॉन 2021” स्पर्धेचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम 28 ऑक्टोबर 2021 ला रात्री 12 वाजता सुरु होऊन 31 ऑक्टोबर 2021रोजी रात्री 11 वाजेपर्यंत चालेल. “आधार हॅकेथॉन 2021” ही स्पर्धा दोन संकल्पनांवर आधारित आहे. पहिली संकल्पना आहे “नावनोंदणी आणि अद्यतने”, यामध्ये नागरिकांना वास्तव जीवनात त्यांचा निवासी पत्ता अद्ययावत करण्यात येत असलेल्या आव्हानांच्या सोडवणुकीबाबत आहे.
           हॅकेथॉनची दुसरी संकल्पना प्राधिकरणाकडून दिल्या जाणाऱ्या “व्यक्तिगत ओळख आणि प्रमाणीकरण” यांच्या बाबतीतील सेवांच्या वितरणात येणाऱ्या समस्यांवरील उपायांवर आधारित आहे. या संकल्पनेअंतर्गत आधार क्रमांक सामायिक न करता किंवा इतर कोणतीही लोकसंख्याविषयक माहिती न पुरवता देखील नागरिकांच्या व्यक्तिगत ओळख निश्चितीसाठीचा पुरावा देण्याविषयी करता येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपायांचा शोध प्राधिकरण घेत आहे.त्यासोबतच प्राधिकरणाने प्रमाणीकरण पद्धतीमध्ये नुकत्याच सुरु केलेल्या एपीआयच्या मदतीने चेहरा प्रमाणित करण्याच्या सुविधेमध्ये अभिनव बदल घडविणाऱ्या संशोधनाच्या शोधात प्राधिकरण आहे. नागरिकांच्या आधार संदर्भातील गरजा पुरविण्यासाठी काही विद्यमान आणि काही नव्या एपीआय आधारित प्रणाली लोकप्रिय करणे हा या संकल्पनेमागचा उद्देश आहे.
           आव्हाने सोडविण्यासाठी प्राधिकरण या स्पर्धेच्या माध्यमातून देशातील युवा संशोधकांकडून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तरे मिळण्याची अपेक्षा करीत आहे. या हॅकेथॉनमधील प्रत्येक संकल्पनेवर आधारित स्पर्धेच्या विजेत्यांना प्राधिकरणातर्फे रोख बक्षिसे आणि इतर आकर्षक लाभ देण्यात येतील. या स्पर्धेचे तपशील आणि नाव नोंदणी अर्ज https://hackathon.uidai.gov.in/वर उपलब्ध आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने