जरा जपून, करोना पुन्हा वाढतोय


ब्युरो टीम : देशभरातील करोना रुग्णसंख्येत मागील चार महिन्यात सातत्याने घट होत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून करोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ दिसून येत आहे. काल, गुरुवारी दैनंदिन रुग्णसंख्या सात हजारांपेक्षा अधिक नोंदवली गेली.  गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत देशभरात ७,२३० नव्या रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे, मागील ९९ दिवसांनंतर दिवसभरात आढळणारी रुग्णसंख्या ही ७ हजारांच्या पुढे गेली आहे. चिंताजनक बाब अशी की, महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांतच जवळपास ७० टक्के रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. 
गुरुवारी (९ जून) देशभरात ७,२३० नवीन करोना रुग्णांची वाढ झाली. यामध्ये दिल्लीत ६२२ नवीन रुग्ण आढळले आहेत. १४ मेनंतर पहिल्यांदा इतकी मोठी रुग्णवाढ पाहायला मिळाली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येतील ही ३९ टक्क्यांची वाढ ठरली. या नव्या रुग्णांमुळे आत्तापर्यंतच्या बाधितांची संख्या ४ कोटी ३१ लाख ९७ हजार ५२२ वर पोहोचली आहे. गुरुवारी ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आत्तापर्यंतचा मृतांचा आकडा पाच लाख २४ हजार ७२३ वर पोहोचला. सद्यस्थितीत ३२,४९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९८.७१ टक्के आहे. यापूर्वी १ मार्चला ७,५५४ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर गुरुवारी दैनंदिन रुग्णसंख्येने सात हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
महाराष्ट्र राज्याचा विचार केल्यास, राज्यात ९ जून रोजी २,८१३ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. ९ जूनपर्यंतच्या आकडेवारीचा विचार केल्यास, राज्यात आत्तापर्यंत एकूण ७७ लाख ४२ हजार १९० करोनाबाधित बरे झालेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे राज्याचे प्रमाण ९७.९८ टक्के आहे. दक्षिण भारतातही करोना रुग्णवाढीचे प्रमाण वाढले आहे. कर्नाटकात ४७१, तामिळनाडूमध्ये १८५ आणि तेलंगणामध्ये १२२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने