ब्युरो टीम : अगदी उमेदवारी जाहीर झाल्यापासून विविध घडामोडींनी गाजलेल्या राज्यसभा निवडणुकीत मतदान संपल्यानंतरही पुन्हा ट्विस्ट आलाय. महाविकास आघाडीच्या तीन मतांवर भाजपने आक्षेप घेत ही मतं बाद केली जावीत, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. त्यामुळे सायंकाळी ५ वाजता सुरु होणारी मतमोजणी अद्यापही सुरु झालेली नाही. गेली २ तास ही मतमोजणी रखडली आहे.
सूत्रांच्या माहिती नुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने जितेंद्र आव्हाड, सुहास कांदे आणि यशोमती ठाकूर मतदान करतानाचे व्हिडिओ मागवून घेतले आहेत. राज्यसभा निवडणुकीची मतपत्रिका भरल्यानंतर संबंधित आमदाराने आपल्या गटाच्या नेमून दिलेल्या प्रतिनिधीला आपली मतपत्रिका दाखवणे आवश्यक आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपली मतपात्रिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दाखवण्याऐवजी ती त्यांच्या हातात दिली. तर यशोमती ठाकूर यांनीही आपली मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिली. शिवसेना आमदार सुहास कांदेंनी देखील तीच चूक केली. त्यामुळे मविआच्या तीनही आमदारांचं मत बाद केलं जावं, अशी मागणी भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. भाजपच्या पत्रानंतर राज्यसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाची एन्ट्री झाली आहे, आयोगाने मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री यशोमती ठाकूर आणि शिवसेना आमदार सुहास कांदे मतदान करतानाचे व्हिडिओ मागवून घेतले आहेत. हे तिन्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग याप्रकरणी निर्णय देणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा