एकनाथ शिंदे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले..



ब्युरो टीम : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीमध्ये यावर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली येथील पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी या प्रश्नावर चर्चेमधून तोडगा निघू शकतं असं म्हटलं आहे. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत असून एकनाथ शिंदेंचा प्रश्न हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असून त्यांच्याकडून आमच्याशी संपर्क साधण्यास आसल्यास चर्चा करु. आज सायंकाळी मी मुंबईला रवाना होणार आहे. सायंकाळी मुंबईमध्ये बैठक होईल अशी शक्यताही पवारांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या दिल्लीत असणाऱ्या शरद पवार यांनी आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पत्रकारांनी एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या बंडासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, सध्या निर्माण झालेल्या या राजकीय पेजामधून मार्ग निघेल. पुढे पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचंय अशी मागणी असल्याचं सांगत प्रश्न विचारला असता शरद पवारांनी, “एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचं ते बोललेत हे मला माहिती नाही. तुमच्याकडूनच मला हे समजतंय,” असं सांगितलं. पुढे बोलताना शरद पवारांनी, या सरकारमधील मुख्यमंत्री पदाची जबाबदारी शिवसेनेकडे आहे. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आणि इतर पदं काँग्रेसकडे आहेत, असं सांगितलं. शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदासंदर्भातील निर्णय घ्यावा असं सूचित करतानाच दुसरीकडे सध्या राज्यात नेतृत्व बदलाची गरज नाही असंही पवार यांनी म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने