खासदार संजय राऊत यांनी केला गंभीर आरोप



ब्युरो टीम :  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरुद्ध बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर आता शिवसेनाही आक्रमक झाली आहे. काहीवेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्याजागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.



एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतच्या ली मेरेडियन हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेना आमदारांना अपहरण करुन त्याठिकाणी नेण्यात आले आहे. या सर्व आमदारांना गुजरात पोलीस आणि केंद्रीय पोलिसांच्या गराड्यात ठेवण्यात आले आहे. अनेक आमदारांनी हॉटेलमधून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याविरुद्ध दहशत आणि खुनी हल्ले झाल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
अकोल्यातील आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी या सगळ्याविरोधात कठोर कारवाई करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने