खासदार विखेंचा यु टर्न, त्या वक्तव्यावर म्हणाले..


नगर : शिवसेनेच्या संदर्भात केलेले भाष्य हे फक्त पारनेर तालुक्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर होते.परंतू त्याचा राज्याच्या राजकारणाशी संबंध जोडून विपर्यास केला गेला.जिल्ह्यात राजकीय निर्णय घेताना प्रदेश भाजपा पदाधिकाऱ्यांचाच अंतिम आदेश मानला जाईल, अशी भूमिका खासदार डॉ. सुजय विखे यांनी मांडतानाच पारनेर येथे  केलेल्या वक्तव्याबाबत खुलासा  दिला आहे.
काल, पारनेर येथे एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात विखे  यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले होते . 'मागील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये माझं एकही वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या विरोधात नाही, मातोश्रीच्या विरोधात नाही. शिवसेनेच्या विरोधात नाही. शिवसैनिकांचे विरोधात नाही, किंवा शिवसेनेच्या आमदारांच्या विरोधात नाही.  एवढच काय, कुठल्याही शिवसेनेच्या तालुक्यात अध्यक्षाच्या विरोधातही नाही.  माझे काही कार्यकर्ते शिवसेनेत गेले, त्याचं मला काही वाईट वाटलं नाही. उलट शिवसेनेसोबत  फक्त पारनेर तालुक्यातच नाही,   तर नगर जिल्ह्यातही भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक व्यक्ती हा शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहील, हे मी आज एक खासदार म्हणून ठामपणे सांगतो. माझ्यावर फडणीस यांनी कारवाई केली, तरी चालेल. नरेंद्र मोदी यांनी कारवाई केली, तरी चालेल. पण मी या शिवसैनिकांना एकटं सोडणार नाही, हे आज ठामपणे सांगत आहे. कारण मी नगर जिल्ह्याचे राजकारण ओळखतो,' असे डॉ. सुजय विखे  म्हणाले होते. या वक्तव्याने नगर जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद भाजपच्या खासदारांनी मान्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली, व भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे.
आता  या वक्तव्यावर विखे  यांनी खुलासा  दिला आहे. ते म्हणाले, 'नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मला निवडून आणण्यात पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. परंतू या तालुक्याच्या बदलत्या राजकीय वातावरणात शिवसैनिकावर होत असलेला अन्याय तसेच राज्यात आघाडी सरकार असतानाही तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा होत  नसलेला विचार पाहाता या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहाण्याची किंवा त्यांना बरोबर घेवून जाण्याच्या दृष्टीने आपण भाष्य केले.परंतू माझ्या वक्तव्याचा थेट राज्यातील राजकारणाशी संबंध जोडून विपर्यास केला.जिल्ह्यात कोणतीही राजकीय भूमिका किंवा निर्णय करताना अंतिम निर्णय हा प्रदेश आणि जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेवूनच करण्याची भूमिका आपली कायम असून याबाबतचा अंतिम निर्णय सुध्दा त्याचाच असणार आहे. पारनेर तालुक्याच्या राजकीय परिस्थितीची वस्तूस्थिती आपण वरिष्ठांना देवून यासंदर्भात चर्चा करणार आहे.'

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने