ब्युरो टीम : राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न महाविकास आघाडीने सुरू केला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत परस्परांविषयी निर्माण झालेल्या अविश्वासाच्या वातावरणानंतर कोणीच माघार घेण्यास तयार नाही. पुरेशी मते नसली तरी दोन्ही जागा लढवण्यावर काँग्रेस ठाम आहे. भाजपनेही मतांचे गणित जुळत नसले तरी सहाही जागा जिंकण्याचा निर्धार केलाय. यासर्व परिस्थितीवर आज, दुपारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत काही तोडगा निघाला नाही तर ही निवडणूकही राज्यसभेप्रमाणे चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
राज्यसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागल्यामुळे महाविकास आघाडी चिंतेत आहे. त्यातच विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु दुसरीकडे राज्यसभेप्रमाणेच या निवडणुकीमध्येही महाविकास आघाडीवर कुरघोडी करण्याची संधी सोडायची नाही, अशा मनस्थितीत भाजप आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोधी होण्याची शक्यता कमी असली तरी आज दुपारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत नेमकं काय होते, हे पाहवे लागणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा