ब्युरो टीम : राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ED) चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने (ED) अनिल परब यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्सही पाठवले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, अनिल परब यांना बुधवारी म्हणजे आजच चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, अनिल परब हे चौकशी टाळून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी गेले आहेत. काहीवेळापूर्वीच अनिल परब शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दाखल झाले आणि त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर आता अनिल परब पुन्हा मुंबईत परततील. त्यानंतर अनिल परब ईडीच्या चौकशीसाठी कधी हजर राहतात, हे पाहावे लागेल.
दापोलीतील अनधिकृत रिसॉर्टमुळे अनिल परब हे सध्या ईडीच्या रडारवर आहेत. हे रिसॉर्ट नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आले. त्यानंतर अनिल परब यांनी रिसॉर्टची विक्री करताना आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अनिल परब हे ईडीच्या कचाट्यात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वीच ईडीने अनिल परब यांच्या निवासस्थानासह सात ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यानंतर आता ईडीने अनिल परब यांना चौकशीसाठी बोलावल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीकडून त्यांना अटक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
दरम्यान, गेल्या महिन्यात २६ मे रोजी पहिले समन्स ईडीकडुन परब यांना बजावण्यात आले होते. ईडीच्या पथकाने दापोलीत तळ ठोकून सोमय्या यांनी आरोप केलेल्या साई रिसॉर्टप्रकरणी येथील विविध शासकीय कार्यालयात जाऊन कागदपत्रं जमा केली होती. न या सगळ्या प्रकरणात साई रिसॉर्टशी आपला काहीही संबंध नाही, असे परब यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा