ब्युरो टीम : शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत झालेल्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता फेसबुक लाईव्ह आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधणार आहेत.
शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी सुरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र, या चर्चेतून कोणताही मार्ग निघाला नाही. त्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले हे. या आमदारांना रात्रीच चार्टर्ड विमानाने गुवाहाटी येथे एअर लिफ्ट करण्यात आलं. तसेच एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे बहुमत असल्याचे म्हटले असून शिवसेनेने निवडलेला गटनेता हा घटनाबाह्य असल्याचेही म्हटले आहे. शिवसेना विधीमंडळाच्या मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्वीटमधून दिली आहे. आजच्या आमदारांच्या बैठकीबाबत सुनील प्रभू यांनी काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातच आज, सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार असून ते यावेळी आपल्या पदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्राला ‘जय महाराष्ट्र’ करतात का, याकडे राज्याचेच नव्हे देशाचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा