ब्युरो टीम: ‘मी इथे महाराष्ट्राच्या शांतीसाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करायला आलोय. उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईला जाणार असून त्यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करणार आहे,’ असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
गुवाहाटीमध्ये वास्तव्यास असलेल्या बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. शिंदे यांनी देवदर्शनानंतर आपण उद्या मुंबईत येऊन बहुमत चाचणीसाठी हजर राहणार असल्याची घोषणा केलीय.
महाविकास सरकार अल्पमतात आल्याने सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी करणारे पत्र भाजपाने मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर केल्याच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपण उद्या म्हणजेच ३० जून रोजी मुंबईत येत असल्याची घोषणा केलीय. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुंबईमधील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. शिंदे यांनी गुवाहाटीमधील रेडिसन ब्लू या हॉटेलमधील बंडखोर आमदारांची तातडीची काल बैठक घेतली. या बैठकीमध्ये पुढील निर्णय आणि वाटचालीसंदर्भात शिंदे यांनी सहकारी आमदारांशी चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. रात्री घेतलेल्या या बैठकीनंतर आज सकाळी आठच्या सुमारास एकनाथ शिंदे हे गुवाहाटीमधील कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचले. एकनाथ शिंदे यांना व्हाय दर्जाची सुरक्षा केंद्राकडून पुरवण्यात आल्याने ते या मंदिरात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला. मंदिर परिसराला काहीकाळ लष्करी छावणीचं स्वरुप प्राप्त झालं होतं.
टिप्पणी पोस्ट करा