मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

ब्युरो टीम : हवामान खात्याने मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत या दोन्ही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. 
मुंबईत काल,गुरुवारी सकाळी सुरु झालेल्या पावसाने तुरळक अपवाद वगळता जराही विश्रांती घेतलेली नाही. त्यातच आज सलग दुसऱ्या दिवशी शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचे दिसत आहे. या पावसाळ्यातील हा पहिलाच मुसळधार पाऊस आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत तब्बल १६३ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. बीएमसी ने तसं ट्विट करून स्पष्ट केले आहे. 
दरम्यान, सलग दोन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. दादर, अंधेरी आणि कुर्ला या भागांमध्ये पाणी साचले आहे. दादरच्या हिंदमाता परिसरालाही नेहमीप्रमाणे तलावाचे स्वरुप आले आहे. या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालक आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तर लोकल ट्रेनचाही खोळंबा झाला आहे. आज सकाळपासून सेंट्रल रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने