ब्युरो टीम : राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी तातडीने विशेष अधिवेशन बोलावल्यानंतर राज्य सरकारने त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यावरून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भाजपाच्या नेत्यांनी भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.
‘तुमच्याकडे बहुमत आहे तर एका तासात तुम्ही बहुमत दाखवू शकता. तुमच्याकडे दोन हात आहेत, तर ते दाखवण्यासाठी तुम्हाला ३० दिवसांची मुदत हवीये का? हात आहेत तर ५ मिनिटांत हात दाखवू शकता. यात काय नवीन आहे. तुम्ही काय शोलेचे ठाकूर नाही ना, की तुमचे हात शालमध्ये अडकले आहेत. बहुमत दाखवायचं असेल तर दाखवा ना’, असं आव्हान मुनगंटीवार यांनी दिलं आहे. तसेच, अडीच वर्षांपूर्वी सत्तास्थापनेवेळी घडलेल्या घडामोडींचा संदर्भ देखील मुनगंटीवारांनी दिला.
‘काही लोक ज्या पद्धतीच्या धमक्या देत आहेत, गुंडगिरीची भाषा करत आहेत, अशांतता निर्माण करण्याचं भाष्य करत आहेत, याकडे लक्ष देता यावं आणि प्रत्येकाला मुक्त वातावरणात लोकशाहीचा अधिकार विधिमंडळात बजावता यावा, हे आम्ही विधिमंडळ सचिव आणि उपाध्यक्षांच्या लक्षात आणून दिलं आहे,’ असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मुंबईत आल्यानंतर भाजपा सुरक्षा पुरवणार का? या प्रश्नावर मुनगंटीवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. ‘शिवसेनेच्या आमदारांना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी भाजपाची नाही. ती जबाबदारी सरकारची आहे. हा महाराष्ट्र आहे. इथे गुंडगिरी करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी महाराष्ट्राची जनता आणि पोलीस विभागाचे अधिकारी सदसदविवेकबुद्धीने कृती करतील’, असे त्यांनी स्पष्ट केले.
टिप्पणी पोस्ट करा