भाजपनेच शरद पवार यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी द्यावी, संजय राऊत असे का म्हणाले

ब्युरो टीम : 'भाजपनेच शरद पवार  यांना राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी,' अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. देशात भाजपविरोधी आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु असतानाच आता संजय राऊत यांनी हे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे उद्या म्हणजे १५ जूनला अयोध्येत जात आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख नेते अयोध्येत दाखल झाले आहेत. यावेळी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'भाजपनेच शरद पवार यांना राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रपती म्हणून संविधानाचे रक्षण करणारा आणि एक मजबूत नेता हवा असेल तर भाजपने शरद पवार यांना उमेदवारी द्यायला हवी. देशाच्या घटनेचे रक्षण करायचे असेल, जनतेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल आणि या देशाला राष्ट्रपती पदावरील व्यक्तीच्या अनुभवाचा फायदा व्हावा असे वाटत असेल तर सध्याच्या घडीला असा नेता म्हणून शरद पवार यांचेच नाव समोर येते, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते पुढे  म्हणाले, 'शरद पवार यांना भाजपने राष्ट्रपतीपदासाठी संधी दिली पाहिजे. पण अशी संधी देण्यासाठी राज्यकर्त्यांचं मन मोठं असावं लागतं. राज्यकर्त्यांचं मन मोठं असेल तरच शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना पाठबळ दिले जाते, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा, याबाबत शिवसेनेची भूमिका अद्याप ठरली नसल्याचेही सांगितले. विरोधी पक्षांनी एकत्र बसून याबाबत निर्णय घ्यायला हवा. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हा सर्वांच्यादृष्टीने स्वीकारार्ह आणि खंबीर असा हवा. असा उमेदवार शोधणे हे सर्वप्रथम महत्त्वाचे आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा, हे ठरवतील, असेही त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने