शिवसेनेची धाकधूक वाढली, कारण....

ब्युरो टीम : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरशीची लढाई दिसत आहे. आमचाच उमेदवार विजयी होणार, असा दावा दोन्ही बाजूंकडून करण्यात येत आहे. आमदारांच्या संख्याबळानुसार सध्या तरी महाविकास आघाडीचं पारडं जड दिसत आहे. मात्र अशातच गुरुवारी रात्री उशिरा घडलेल्या काही घडामोडींमुळे शिवसेनेची खासकरुन शिवसेना उमेदवार संजय पवार यांची डोकेदुखी वाढली आहे.
राज्यसभा मतदानाची प्रक्रिया काही प्रमाणात क्लिष्ट समजली जाते. त्यामुळे ऐनवेळी काही गडबड होऊ नये म्हणनू काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपापल्या उमेदवारांना ४२ मते देण्याऐवजी दोन ते तीन मतांचा कोटा वाढवून देण्याची शक्यताच अधिक आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीचा ४४ चा कोटा दिला जाईल. इम्रान प्रतापगढी हे थेट काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचेच उमेदवार असल्याने काँग्रेसकडील सगळा ४४ चा कोटा त्यांना दिला जाऊ शकतो. असं झाल्यास आघाडीच्या म्हणजेच सेनेच्या दुसऱ्या उमेदवारांची पहिल्या पसंतीची मते ४० वरून ३६ वर येतील व चुरस अधिक वाढेल.
भाजपने आपल्या पहिल्या दोन उमेदवारांना ४२ चा कोटा दिल्यास त्यांच्याकडे ३३ मते शिल्लक राहतात. तसंच महाविकास आघाडीने आपल्या तीन उमेदवारांना ४२ चा कोटा दिल्यास त्यांची ४० मते शिल्लक राहतात. परंतु काँग्रेस राष्ट्रवादीने आपल्या उमेदवाराचा कोटा वाढवल्यास हे गणित बदलणार आहे. त्यामुळे या निवडणुकीतील चुरस अधिकच वाढणार असून आता शिवसेना बाजी मारणार का भाजप याकडे अनेकांचे लक्ष लागले आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने