मविआ’ मधुन शिवसेना बाहेर पडण्यास तयार, संजय राऊत स्पष्टच बोलले


ब्युरो टीम : ‘तुमचं म्हणणं आहे ना, महाविकास आघाडीतून बाहेर पडा, यावर नक्की विचार करु. फक्त पुढच्या २४ तासांत बंडखोर आमदारांनी मुंबईत यावं. तुमची अधिकृत भूमिका शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडावी. तुमच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल,’ असं मोठं वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 
संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण संजय राऊत यांचे हे वक्तव्य म्हणजे शिवसेना ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आम्ही शेवटपर्यंत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहू, अशी भाषा केली जात आहे. मात्र, त्याचवेळी आता शिवसेना मात्र महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी दर्शवित असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातून निसटलेले कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत आमदार पाटील आणि आमदार देशमुखांनी सुटकेचा थरार सांगितल्यावर संजय राऊत यांनी पुढच्या दोन मिनिटांत राज्याचं राजकारण बदलणारं मोठे वक्तव्य केले आहे. 
राऊत म्हणाले, ‘जे आमदार या क्षणी महाराष्ट्राच्याबाहेर आहेत, या सर्व आमदारांची इच्छा असेल तर महाविकासआघाडीतून शिवसेनेने बाहेर पडले पाहिजे आणि वेगळा विचार केला पाहिजे, त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल. पण त्यांनी मुंबईत येऊन ही मागणी मांडावी. महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही २४ तासांत परत या. तुमच्या मागणीचा उद्धव ठाकरे विचार करतील. हे मी जबाबदारीने सांगत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने