एकनाथ शिंदेंची आदित्य ठाकरे, संजय राऊतांसोबत बाचाबाची ? नेमकं काय घडलं होत




ब्युरो टीम : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या पक्षाविरोधात बंड पुकारण्याच्या दोन दिवस आधीच एक पक्षांतर्गत वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांचा राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत शाब्दिक वाद झाला होता. 
एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरीचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास ३५ ते ४० आमदार आहेत. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार संकटात आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळं विविध चर्चांना उधाण आलं आहे. तसंच, दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे व संजय राऊतंसोबत झालेल्या मतभेदाची किनारही या शिंदेंच्या बंडाळीसोबत जोडली जात आहे. 
विधान परिषदेच्या निवडणुकीच्याआधी पवईमधील रिनायसन्स हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांची रहायची व्यवस्था करण्यात आली होती. याचवेळी एकनाथ शिंदे यांचा आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांसोबत शाब्दिक खडाजंगी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवसेनेकडे असणारी अतिरिक्त मतं काँग्रेससाठी वापरण्याच्या मुद्द्यावरुन या नेत्यांमध्ये वाद झाला. शिवसेनेची अतिरिक्त मतं काँग्रेससाठी वापरण्याला शिदेंचा विरोध होता. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांना आवश्यक ती मतं मिळाली आणि ते विजयी झाले. मात्र काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे पराभूत झाले. दहाव्या जागेसाठी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पहायला मिळाला आणि भाजपाने पाच जागा जिंकल्या.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने