?
ब्युरो टीम: राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. काल विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक झाली. भाजपचे सर्वच्या सर्व ५ उमेदवार विजयी झाले. यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशिकला जाणार होते. मात्र काल रात्री उशिरापर्यंत सेलिब्रेशन झालं. त्यामुळे फडणवीसांनी नाशिक दौरा रद्द केला आणि आज सकाळी लवकर ते दिल्लीला गेले.
विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नाशिकमध्ये येणार होते. तिथे महाविद्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. त्यानंतर योग दिनाचा कार्यक्रम होणार होता. मात्र शाह यांनी नाशिकचा दौरा अचानक रद्द केला. त्यानंतर फडणवीस यांचाही दौरा रद्द झाला आणि ते दिल्ली दरबारी रवाना झाले.
विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार विजयी झाल्यानंतर आता महाविकास आघाडीला हादरे बसू लागले आहेत. राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं सर्व उमेदवार निवडून आणले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. अवघ्या दोन आठवड्यांमध्ये भाजपनं मविआला दोन मोठे दणके दिले आहेत. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.
शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले आहेत. ते गुजरातच्या सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे १३ ते १५ आमदार आहेत. एका बाजूला शिंदे नॉट रिचेबल झाले असताना दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला पोहोचले आहेत. आज सकाळी फडणवीस दिल्लीत दाखल झाले. त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित नव्हता.
टिप्पणी पोस्ट करा