ब्युरो टीम : ‘आजच्या परिस्थितीला संजय राऊत हे जबाबदार आहेत, अवघ्या महाराष्ट्रातील शिवसैनिकांना विचारा. शिवसेनेला दावणीला बांधण्याचं काम देखील संजय राऊतांनी केलं आहे. ५६ वर्षाची स्वाभिमानी शिवसेना बारामतीच्या वळचळणीला नेऊन उभा करण्याचं काम संजय राऊतांनी केलं आहे, आम्ही त्यांचा निषेध करतो. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक नाराज आहेत,’ अशी घणाघाती टीका माजी आमदार आणि मंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे. तसेच शिवसेनेच बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना शिवतारे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘आपण दोन हजार कार्यकर्त्यासह ठराव करून त्याचे पत्र उद्धव ठाकरे यांना थोड्याच वेळात पाठविणार आहोत,’ असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्देशांनुसार उद्या अर्थात ३० जून रोजी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानभवनात हजर राहावं लागेल. दुसरीकडे बंडखोर आमदारही उद्या मतदानासाठी मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून रणनीती आखली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा