असं कसं घडलं, धनंजय मुंडे फडणवीस यांच्या भेटीला

ब्युरो टीम : महाराष्ट्र राज्यात काल, मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आणखी एक मोठी घडामोड घडली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू मानले जाणारे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी काल, अचानक राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे. खात्रीलायक सुत्रांकडून ही माहिती मिळाली असून यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन कोणता भूंकप होणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. 
राज्यातील गेल्या काही तासांमधील राजकारणावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. त्यांना कोरोना झाल्यामुळे ते सध्या इतरांपासून अंतर राखून आहेत. मात्र, त्यांच्या मर्जीतील असलेले धनंजय मुंडे आता फडणवीसांना भेटले आहेत. 
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे हे गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास देवेंद्र फडणीवस यांच्या सागर बंगल्यावर गेले होते. याठिकाणी फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर धनंजय मुंडे हे सागर बंगल्यातून बाहेर पडले. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी झाली, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. परंतु, सध्याची अस्थिर राजकीय परिस्थिती पाहता धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या गटातील मानले जातात. २०१९ मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर शपथ घेतली होती तेव्हादेखील धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या गटात होते. त्यामुळे आतादेखील काही नवीन राजकीय समीकरणांची नांदी होऊ घातली आहे का, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने