ऐकावे ते नवलंच! एका लग्नाची अशी ही गोष्ट


ब्युरो टीम : लग्न म्हटलं की नवरा - नवरी हे दोघे  हमखास  आले. पण आजकाल कोण काय करेल, याचा  भरवसा  राहिला नाही. त्यामुळेच एखादी गोष्ट ऐकल्यानंतर त्यावर सहजासहजी विश्वास बसत नाही, व ऐकावे ते नवलंच, असे आपण म्हणतो, पण ते खरे आहे. अशीच एक घटना गुजरात मधून समोर आली आहे. स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन देशभरात चर्चेत आलेल्या गुजरातच्या क्षमा बिंदुने अखेर बुधवारी स्वतःशीच लग्न केले.
क्षमाने स्वतःच्याच लग्नात लाल कपडे परिधान केले होते.  आपल्या भांगेत स्वतः सिंदूर भरले आणि स्वतः मंगळसूत्र घालून एकटीने सात फेरे घेतले. लग्नाचे विधी पूर्ण केल्यानंतर क्षमा म्हणाली, “मी शेवटी एक विवाहित स्त्री आहे, याचा मला खूप आनंद झाला आहे".
 
सर्व रितीरिवाजांनुसार लग्न करून क्षमा बिंदुने स्वतःला दिलेले वाचन पूर्ण केले आणि एका खास विवाह सोहळ्यात स्वतःशी लग्नगाठ बांधली. लग्नादरम्यान मेहंदी सेरेमनी, हळदी-कुंकवाचे विधी झाले. वडोदराच्या गोत्री येथील घरात  क्षमाने हिंदू रितीरिवाजांनुसार स्वतःशी लग्न केले. मात्र, या लग्नात मुलगा किंवा लग्न लावणारे पुरोहित नव्हते, त्यामुळे मोबाईलवर मंत्रोच्चर सुरु करून विधी पूर्ण केले. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता क्षमाने कुटुंबातील जवळच्या व्यक्ती आणि खास मित्रांच्या उपस्थितीत स्वतःशी लग्नगाठ बांधली.
 भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच विवाह सोहळा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे वाद होऊ नयेत, यासाठी क्षमाने आपल्या लग्नाची तारीख बदलली होती. क्षमाने यापूर्वी ११ जुन रोजी स्वतःशी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हापासून त्यांच्या घरी सतत लोकांची वर्दळ सुरु होती.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने