ब्युरो टीम : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये महत्त्वाच्या घडामोडी सुरु आहेत. महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकारणाबाबत अनेकजण आपलं मत मांडताना दिसत आहे. यामध्ये कलाकार मंडळी देखील मागे नसल्याचे दिसत आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने देखील चक्क महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्याची परिस्थिती पाहता ‘रानबाजार’ वेबसीरिजमधील एका सीनचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
या व्हिडीओची सुरुवात अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या संवादाने होते. या सीनमधील त्यांचा एक संवाद प्रचंड गाजत आहे. आणि तो संवाद म्हणजे “सामान्य माणसांचा आता राजकारण्यांवर विश्वास राहिलेला नाही.” तेजस्विनी पंडितने सध्या सुरु असलेलं राजकीय वातावरण पाहून हा व्हिडीओ शेअर केला असल्याचंच दिसत आहे. " रान बाजार " काय मग बघताय ना ??? , असे कॅप्शनही तिने या व्हिडिओला दिले आहे.
दरम्यान, तेजस्विनीने हा व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांनी याबाबत विविध कमेंट करायला सुरुवात केली आहे. सध्याच्या परिस्थितीला योग्य असा हा व्हिडीओ असं अनेक जणांनी कमेंटद्वारे म्हटलं आहे. तर एका युजरने म्हटलं की, “मला तरी असं वाटतं रानबाजार आणि सध्या सुरु असलेल्या राजकारणामध्ये फारसं अंतर नाही.”
टिप्पणी पोस्ट करा