ब्युरो टीम : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन दिवसांपासून विविध नाट्यमय घडामोडी घडत आहे. आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी असल्याचे वक्तव्य केल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यातच आता शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे १२ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी याचिका सादर करण्यात आली आहे. खासदार अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सत्ता नाट्याचा नवीन अंक सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे १२ आमदारांचं सदस्यत्त्व रद्द करण्यासाठी याचिका सादर करण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह
तानाजी सावंत,प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर,लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदीपान भुमरे,अब्दुल सत्तार, महेश शिंदे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले. आता शिवसेनेच्या खेळीला एकनाथ शिंदे गट कोणते उत्तर देणार, विधानसभा उपाध्यक्ष यावर काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा