राज्यात करोना वाढतोय ? आरोग्यमंत्री टोपे म्हणाले

मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड, पालघर या सहा जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रभाव वाढला आहे. बऱ्याच ठिकाणी करोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे. काही ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट ५, ६, ८ टक्क्यांपर्यंत गेला आहे. ही आकडेवारी काळजी वाढवणारी असल्याचं आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यातील करोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती होणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. रुग्णसंख्या वाढत असताना आज मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मास्कसक्तीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली. करोना रुग्ण वाढलेल्या जिल्ह्यांमध्ये चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचं टोपे म्हणाले. काल रविवार असल्यानं चाचण्या कमी झाल्या. मात्र आजपासून चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असंही टोपे म्हणाले. काही जिल्ह्यांमध्ये दर १०० पैकी चाचण्यांमागे ६ ते ८ टक्के चाचण्या पॉझिटिव्ह येत आहेत. या ठिकाणी रुग्ण दाखल होण्याचं प्रमाण १ टक्का आहे. सुदैवानं रुग्णांची प्रकृती गंभीर नाही, अशी माहिती राजेश टोपेंनी दिली. राज्यात मास्कसक्ती लागू करण्यात आलेली नाही. तसा निर्णय झालेला नाही. पण लोकांनी स्वत:हून मास्क घालावा, असं आवाहन टोपेंनी केलं. लोकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी मास्क घालावा. मास्क घातला नाही म्हणून कारवाई होणार नाही. दंड आकारला जाणार नाही. मात्र लोकांच्या स्वेच्छेनं मास्क घालावा, असं टोपे म्हणाले. करोनाचा नवा व्हेरिएंट अधिक संक्रामक असल्यानं काळजी घेणं गरजेचं असल्याचं टोपे म्हणाले. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं आयोजित केलेल्या पार्टीला अनेक सेलिब्रिटी, बॉलिवूड स्टार्स गेले होते. यापैकी अनेकांना करोनाची लागण झाली. यातून आपल्याला करोनाच्या वाढत्या पॉझिटिव्हिटी रेटचा अंदाज येईल, असं टोपेंनी म्हटलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने