ब्युरो टीम : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांना मिळालेल्या अतिरिक्त मतांपैकी एक मत हे शिवसेनेला ट्रान्स्फर होऊच शकलं नसतं. कारण, विरोधकांच्या (भाजपच्या) गटातील एका आमदाराने मला सांगून प्रफुल्ल पटेल यांना मत दिले होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. ते आज सकाळी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
प्रफुल्ल पटेल यांना सुरक्षित करायच्या नादात राष्ट्रवादीने त्यांच्यासाठी जास्त मतांचा कोटा राखून ठेवला. ही मतं शिवसेनेच्या संजय पवार यांना देता आली नसती का, असा प्रश्न शरद पवारयांना विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवार यांनी हा खुलासा केला. ते पुढे म्हणाले, भाजपच्या गटात असे अनेक लोक आहेत की, ज्यांच्यासोबत मी कधीकाळी काम केले आहे. मी एखादा शब्द टाकला तर नाही बोलायची त्यांची तयारी नसते. पण मी या सगळ्यात पडलो नाही. तरीही विरोधी गटातील एका आमदाराने स्वत:हून राष्ट्रवादीला मतदान केले. हा आमदार भाजपचा नसून अपक्ष आहे. पण तो भाजपच्या गटातील आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
राज्यसभा निवडणुकीचा निकाल पहाटे चार वाजता जाहीर झाला. यामध्ये सहाव्या जागेवरील लढतीमध्ये भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांच्यावर मात केली. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शरद पवार यांनी राज्यसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात भाष्य करताना म्हटले की, अपक्षांना आपल्या बाजूने वळविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला आहे. अपक्ष आमदार आपलीशी करण्यात विरोधी फडणवीस यांना यश आलं. राज्यसभा निकालाने मला कोणताही धक्का बसलेला नाही. महाविकास आघाडीच्या एकूण संख्येप्रमाणे मतदान झालं. तिन्ही पक्षातील एक मतंही फुटलं नाही. जी मतं फुटली आहेत, ती अपक्षांची आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा