ब्युरो टीम : राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली असून शिवसेना नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या जवळपास १३ आमदारांसोबत संपर्काबाहेर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे गुजरातमध्ये सूरतमधील एका हॉटेलात आमदारांसोबत आहेत. सूरतमधील या हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इतर कोणालाही या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही आहे. पोलीस हॉटेलमध्ये जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत.
सूत्रांनुसार, एकनाथ शिंदे आणि इतर आमदार गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील नेत्यांच्या संपर्कात आहेत. गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर काही आमदारांनी पाटील यांची भेट घेतल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान पाटील यांनी यावर कोणतंही भाष्य करणं टाळलं असून ‘मी गांधीनगरमध्ये असून काही आमदार सूरतमध्ये आल्याची माहिती मिळाली,’ असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला असताना एकनाथ शिंदे अचानक बेपत्ता झाले असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवारी विजयी झाले असताना शिवसेना आणि काँग्रेसची मतं फुटली आहेत. त्यातच एकनाथ शिंदेशी संपर्क होत नसल्याने त्यांनी बंड पुकारल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा