ब्युरो टीम : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यानं निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. भाजपचे ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन अर्ज कायम असल्यानं १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनं भरलेला तिसरा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. राष्ट्रवादीच्या शिवाजीराव गर्जे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. गर्जे यांनी डमी अर्ज दाखल केला होता.
राज्यसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यानंतर त्यांची आक्रमकता वाढली आहे. भाजपनं विधानपरिषदेसाठी ५ उमेदवार दिले आहेत. भाजपनं राज्यसभा निवडणुकीत पहिल्या पसंतीची १२३ मतं मिळवली होती. तर, महाविकास आघाडीला पहिल्या पसंतीची १६२ मतं मिळाली होती. शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाल्यानं विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करावी, अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, काँग्रेसकडून दोन पैकी एकाही उमेदवाराचा अर्ज मागे न घेण्यात आल्यानं निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे.
विधान परिषदेसाठी भाजपकडून प्रविण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी दिली गेलीय. शिवसेनेनं विधानपरिषद निवडणुकीसाठी सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना उमदेवारी दिली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा