तुम्ही कोणत्याही वकिलाला विचारा, बंडखोरांकडे केवळ दोनच पर्याय : आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना धनुष्यबाण आपल्याकडेच राहणार असल्याबाबत आश्वस्त केलं. तसेच बंडखोरांपुढे केवळ दोनच पर्याय असल्याचं मत व्यक्त केलं.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे २/३ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केलाय. शिंदे गटाकडून वेगळा गट स्थापन करण्याबाबतही बोललं जातंय. तसेच शिवसेना पक्षावर दावा करणे आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवणे अशाही हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना धनुष्यबाण आपल्याकडेच राहणार असल्याबाबत आश्वस्त केलं. तसेच बंडखोरांपुढे केवळ दोनच पर्याय असल्याचं मत व्यक्त केलं. ते मुंबईत शिवसैनिकांसमोर बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, “काही लोकांना वाटतं चिन्हं त्यांच्याकडे जाणार, पण धनुष्यबाण आपलाच राहणार आहे. जे बंडखोर गुवाहटीत गेले आहेत त्यांना वाटतं गट बनू शकतो. ते खोटं बोलत आहेत. तुम्ही कोणत्याही वकिलाला विचारा, यांना केवळ दोनच पर्याय आहेत. एकतर प्रहारमध्ये विलीन व्हा किंवा भाजपामध्ये विलीन व्हा. म्हणजे स्वतःची ओळख पुसून टाका.”

“मी बंडखोरांना प्रत्येक मतदारसंघात जाऊन पाडणार”

“आज नाही तर उद्या यांची आमदारकी रद्द होणार म्हणजे होणार. मी यांना प्रत्येक मतदारसंघात जाऊन पाडणार आहे. त्यांना पुन्हा विधानभवनाची पायरी बघून द्यायची नाही अशी मी शपथ घेतली आहे. ताकद शिवसेनेची आहे, हे सर्वांना दाखवून द्यायचं आहे. बंडखोरांमध्ये हिंमत असेल, तर आज राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोरं जा. आम्ही तुमच्यासमोर उभे राहून प्रत्येकाला पाडू,” असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना दिलं.

“एक मित्र म्हणाला तुमचं आडनाव काही दिवस ठोकरे करा”

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “मला काल एका मित्राचा फोन आला. तो म्हणाला की, आदित्य तुम्हाला आता लढा द्यायचा आहे. गद्दार आमदार कधी ना कधी महाराष्ट्रात येणार आहेत. मी म्हटलं बरोबर आहे. त्यावर तो म्हणाला तुमचं आडनाव काही दिवस ठोकरे करा. मी म्हटलं ठोकरे नाही, ठोकरेपेक्षाही ठाकरे हे नाव अधिक शक्तीशाली आहे.”

“विमानतळावरून विधानसभेचा रस्ता कोठून जातो?”

“कधी ना कधी ‘फ्लोअर टेस्ट’ होणार आहेच. मात्र, त्याआधी विमानतळावरून विधानसभेचा रस्ता कोठून जातो? कदाचित ते राज्यात सीआरपीएफ तैनात करतील, कदाचित सैन्य तैनात करतील, हेलिकॉप्टर, रणगाडे आणतील. प्रत्येक शिवसैनिक उभा राहणार आहे आणि पाहणार आहे,” असं आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं.

“”मी बंडखोरांना आव्हान देतो की या आणि विधानसभेत माझ्या समोर बसा”

“मी बंडखोरांना आव्हान देतो की या आणि विधानसभेत माझ्या समोर बसा. उद्धव ठाकरे यांच्या समोरही बसण्याची गरज नाही. आम्ही काहीही करणार नाही, हाताची घडी, तोंडावर बोट. तेव्हा मी डोळ्यात डोळे घालून बोलणार आहे की काय कमी केलं तुम्हाला? कोणाच्या नावावर निवडून आले आहात तुम्ही?” असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

“राक्षसी महत्त्वकांक्षा असणाऱ्यांची गळचेपी कुठेही होऊ शकते”

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “प्रचार करताना यांचे चोचले पाहून घ्यायचे, तिकिट देताना यांची नाराजी पाहायची. जे निधी मिळाला नाही म्हणतात त्यांची संपूर्ण यादी आहे. ज्यांच्या महत्त्वकांक्षा राक्षसी आहेत त्यांची गळचेपी कुठेही होऊ शकते. प्रत्येक मतदारसंघात अमाप निधी मिळाला आहे. आम्ही निधी देतो तो उपकार करत नाही. लोकांच्या कामासाठी जनतेचा पैसा देत असतो. हा स्वतःला विकून घ्यायला आणि द्यायला पैसा नसतो.”

“अनेकदा प्रसंग वेगवेगळे येत असतात. कधी ईडीची फाईल असेल, कधी वेगळं कारण असेल. २-४ लोकांनी फोन करून सांगितलं की, आम्ही लाचार झालोय, आम्ही तुमचेच आहोत. काही गोष्टींचं दुःख आहे. प्रकाश सुर्वे सारखा माणूस तिथं गेला असेल यावर माझा विश्वास बसत नाही. मनाने तरी ते तिथं नसतील. तो माणूस माझ्या कार्यालयात रोज बसायचा, रस्त्याचं, फुटपाथचं, एसआरए, वनविभाग कशाचंही काम असो त्यांचं प्रत्येक काम मी केलं. फोन करून, मेसेज करून सांगायचे मी लगेच काम झालं म्हणून समजा सांगायचो,” अशी आठवण आदित्य ठाकरे यांनी सांगितली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने