शिवसेनेच्या गोटात एकतरी आमदार उरेल की नाही ?


ब्युरो टीम: शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेते रामदास कदम यांचे सुपूत्र योगेश कदम हेदेखील एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी योगेश कदम बुधवारी सकाळी गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता आज दुपारपर्यंत शिवसेनेच्या गोटात एकतरी आमदारा उरेल की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.
एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सूरतला जाऊन बंडाचे निशाण फडकावले होते. काल दिवसभर त्यांचा मुक्काम सूरतमधील ली मेरेडियन हॉटेलमध्ये होता. मात्र, त्यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, याचा आकडा स्पष्ट होऊ शकला नव्हता. अखेर बुधवारी सकाळी एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन गुवाहाटीमध्ये दाखल झाले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना आणि सहकारी पक्षाचे मिळून ४० आमदार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्याला शिवसेनेचे आणखी १० आमदार येऊन मिळतील, असा दावा केला होता. एकनाथ शिंदे यांचा हा दावा आता खरा ठरताना दिसत आहे. कारण, काहीवेळातच शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड आणि आमदार योगेश कदम हे एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळणार आहेत. संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. तर योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांच्यावर मध्यंतरीच्या काळात उद्धव ठाकरे प्रचंड नाराज होते. त्यामुळे दापोली जिल्ह्यात मातोश्रीच्या आशीर्वादाने अनिल परब यांनी रामदास कदम गटाचे खच्चीकरण केले होते. कदम गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली होती.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने