पुणे : राज्यात सध्या मान्सूनची प्रतिक्षा आहे. पण मान्सूनला राज्यात येण्यासाठी विलंब होत आहे. मात्र, पुढच्या ५ दिवसांत संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज, अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या ढगाळ वातावरण असून काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र, कोकण याभागात पाऊस वाढण्याचा इशारा हवामाना खात्याने दिलाय.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १० जूनपासून कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यात आणि घाटमाथ्यावर ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप सुरू आहे. पण उद्यापासून या शहरांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावू शकतो. मुंबईसह, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे जळगाव, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करीत असणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा