आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड


ब्युरो टीम :  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे  यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या ४० पेक्षा जास्त आमदारांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिले आहे. त्यामुळे शिंदें विरुद्ध ठाकरे  अशी स्थिती सध्या पहायला मिळत आहे. बंडामुळे आता शिवसेनेचे कार्यकर्तेही एकनाथ शिंदेवर नाराज झाले आहेत. आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड केली आहे
दुसरीकडे, शिवसेनेचे तब्बल ४० आमदार गळाला लावून संपूर्ण पक्षच आपल्या ताब्यात घेण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ शिंदे यांन गुवाहाटीतून एक नवे ट्विट केले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारने आपल्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. 
राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असे एकनाथ शिंदे यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, दुसरीकडे राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 
एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्री आपल्या समर्थक आमदारांसह गुपचूप सूरतला निघून गेले होते. मध्यंतरीच्या काळात एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या आमदारांसह आपला मुक्काम गुवाहटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये हलवला होता. सध्या या हॉटेलमध्ये शिवसेनेचे ४० आणि १० अपक्ष आमदार असल्याची माहिती आहे. आसाम सरकारकडून या सगळ्यांच्या सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरक्षिततेसाठी रॅडिसन ब्लू हॉटेलबाहेर स्थानिक पोलीस आणि केंद्रीय पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील सुरक्षाव्यवस्थेत कोणतीही कमतरता नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांचा आरोप पाहता या आमदारांच्या महाराष्ट्रात राहत असलेल्या कुटुंबीयांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने