ब्युरो टीम : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज सकाळी कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलेलं असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येतीय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली. यानंतर काँग्रेस नेते कमलनाथ आणि नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आमचा एकही आमदार फुटला नसल्याचं यावेळी कमलनाथ यांनी सांगितलं. तसंच उद्धव ठाकरे कोविड पॉझिटिव्ह असून फोनवरुन त्यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती पटोले यांनी दिली आहे.
'काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली आहे. या बैठकीला ४४ पैकी ४१ आमदार उपस्थित होते. तीन आमदार प्रवासात आहेत. काँग्रेस पक्षात एकता आहे,' असं कमलनाथ यांनी सांगितलं. 'उद्धव ठाकरेंना करोनाची लागण झाली असून माझी त्यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली. काँग्रेस महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी राहील असं आश्वासन दिलं आहे. भाजपाने झारखंड, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेशात ज्या प्रकारे पैसा आणि पदाचं राजकारण केलं तसंच राजकारण सुरु आहे. हा आपल्या संविधानाशी खेळ आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत एकता कायम राहील याचा आम्हाला विश्वास आहे,' असं कमलनाथ यांनी सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'मी आता शरद पवारांसोबतच्या बैठकीसाठी जात आहे. उद्धव ठाकरेंसोबतही बैठक होती, पण त्यांना करोना झाला आहे. त्यामुळे ही बैठक होणार नाही'.
टिप्पणी पोस्ट करा