सत्याचा विजय होईल, रोहित पवार प्रचंड आशावादी!


ब्युरो टीम : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून भाजपाने सत्तास्थापनेचा दावा करण्याची तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे रोहित पवार यांनी सत्याचा विजय होईल, हा विश्वास आहे, अशी फेसबुक पोस्ट करीत एकप्रकारे पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रवादीची सत्ता येईल, असा विश्वास दाखवला आहे. 
उद्धव ठाकरेंनी राजीनामा देताच मुंबईत भाजपाच्या कार्यालयाबाहेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना आणि भाजपा नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.  रोहित पवार यांनीही एक फेसबुक करीत पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केलाय रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे,
'कोरोना, वादळे, महापूर यांसारख्या असंख्य संकटांवर मात करत मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वात महाविकासआघाडी सरकारने गेली अडीच वर्षे सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसा राज्यकारभार केला. सर्वसामान्यांना आपल्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे भावणारे मुख्यमंत्री राजीनामा देत असताना महाराष्ट्र नक्कीच स्तब्ध झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलंच असेल.
उपलब्ध सर्व आर्थिक-राजकीय संसाधनांचा पद्धतशीरपणे वापर करणाऱ्या राज्यातील भाजपा नेतृत्वाला महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे श्रेय नक्कीच जाईल. कारण गेली अडीच वर्षे शक्य ते सर्व प्रयत्न करूनही यश येत नव्हते अशा स्थितीत सातत्याने सरकार पाडण्याचे प्रयत्न करत राहणं ही साधी सोपी गोष्ट नव्हती.
सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून राजकीय पटलावर वावरत असताना राजकारणाच्या बाबतीत माझा विचार काहीसा वेगळा होता. परंतु सध्याचं सत्तानाट्य बघितल्यानंतर मात्र राजकारणात बऱ्याच इतर गोष्टीही आवश्यक असतात, हे आज काहीअंशी जाणवलं. राजकीय रणनीती म्हणून बघताना भाजपच्या काही गोष्टी शाश्वत असल्या तरी सत्तेचा हा मार्ग पूर्णता शाश्वत होऊ शकत नाही, हेही तेवढंच सत्य आहे.
सामान्य माणसात राहून सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून काम करणं हा मार्ग कठीण असला तरी सत्तेचा हाच शाश्वत मार्ग असू शकतो. त्यामुळं आज काहीसी निराशा असली तरी ‘अपना भी टाईम आएगा’ हाही विश्वास आहे.
सुरत - गुवाहाटी कुठल्या का मार्गाने होईना भाजपचे सरकार राज्यात स्थापन होतेय, याबद्दल त्यांना नक्कीच शुभेच्छा असतील. जीएसटीचे पैसे, ओबीसी–मराठा–धनगर आरक्षण असे अनेक विषय केंद्राशी संबंधित आहेत. केवळ महाविकास आघाडी सरकारला श्रेय मिळेल म्हणून या सरकारच्या काळात केंद्राने हे विषय सोडवण्यास सहाय्य केलं नाही. परंतु राज्यात आता भाजपचं सरकार स्थापन होत असताना राज्याचे नेतृत्व नक्कीच हे सर्व विषय केंद्राकडून प्रामाणिकपणे सोडवून आणेल, ही आशा आहे. 
मुखमंत्र्यानी आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने अजित दादा तसेच काँग्रेस नेत्यांच्या सोबतीने राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचा, तत्वांचा वसा पुढे नेत विघातक वृत्तीच्या राजकारणापासून राज्याचं संरक्षण करत सामाजिक एकतेचा धागा मजबूत केला. येणारं सरकारही त्याच पावलांवर चालत महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती जपेल ही अपेक्षा आहे.
देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यासाठी सुरत–गुवाहाटीवरून केंद्रीय सत्तेच्या माध्यमातून सत्तेचा मार्ग काहींनी शोधला असला तरी हे सत्तानाट्य महाराष्ट्राच्या जनतेला नक्कीच पटलेलं नसेल.
सत्य आज कुठेतरी काही अंशी हरताना दिसत असलं तरी शेवटी विजय मात्र सत्याचाच होतो हा इतिहास राहिला आहे. येणाऱ्या काळात ज्या दिवशी जनतेकडून कौल घेतला जाईल त्यादिवशी नक्कीच सत्याचा विजय होईल, हा विश्वास आहे.'

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने