ब्युरो टीम : उद्या ठाकरे सरकारला सभागृहात आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. काहीवेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी फडणवीस यांनी राज ठाकरे यांना मनसेची ताकद भाजपच्या पाठिशी उभी करण्याची विनंती केली. आमदार राजू पाटील यांनी महाविकास आघाडीला मतदान करू नये, असे फडणवीस यांनी राज यांना सांगितल्याचे समजते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी विशेष अधिवेशन बोलावण्याचे निर्देश दिले आहेत. उद्या सकाळी ११ वाजता अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होईल. अधिवेशनाचा मुख्य अजेंडा हा मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव हाच असेल. बहुमत चाचणीची प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ण केली जाईल आणि कोणत्याही कारणास्तव स्थगित केली जाणार नाही.बहुमत चाचणी घेत असताना प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी ही मतमोजणी शिरगणती पद्धतीने घेतली जाईल. या पद्धतीनुसार प्रत्येक आमदाराला त्याच्या जागेवर उभं रहावे लागते आणि त्याची मोजणी करण्यात येईल. संबंधित सदस्याची मोजणी ही त्याच्या जागेवर येऊन केली जाईल, अशी सूचनाही राज्यपालांनी दिल्या आहेत. त्यातच भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही फोन केला आहे.
दरम्यान, यापूर्वीही राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले होते. आतादेखील ते भाजपच्याच बाजूने उभे राहणार, असे दिसत आहे.
टिप्पणी पोस्ट करा