ब्युरो टीम : महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी अयोध्येत पत्रकारपरिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही आमची तीर्थयात्रा आहे राजकीय यात्रा नाही, इथे राजकारण करायला आलेलो नाही, दर्शन घ्यायला आलो आहे. असे वक्तव्य केले. पत्रकारपरिषदेला शिवसेना नेते संजय राऊत, युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई हे देखील उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, 'आपल्या मनात कदाचित प्रश्न असतीलच पण त्याचं एकच उत्तर आहे, हे जे काही आमचं आजचं इथे येणं आहे, ही आमची तीर्थयात्रा आहे राजकीय यात्रा नाही. इथे राजकारण करायला आलेलो नाही, दर्शन घ्यायला आलेलो आहे. याचबरोबर, महत्वाची गोष्ट म्हणजे आज इथे आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलेलं आहे, की ते स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणार आहेत. पत्रव्यवहार करणार आहेत आणि या अयोध्येत या पावनभूमीत महाराष्ट्र सदनासाठी देखील जागा मागणार आहेत. साधारणपणे १०० खोल्यांचं किंवा जास्त जमले असं महाराष्ट्र सदन आम्हाला इथे बनवायचं आहे. महाराष्ट्रातून इथे अनेक भाविक येत असतात. त्यांना राहण्यासाठी एक चांगली जागा इथे निर्माण कराची आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
टिप्पणी पोस्ट करा