ब्युरो टीम : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. या राजकीय गदारोळावर बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी एक ट्विट केले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपाने एकनाथ शिंदेंना घातली आहे का? असा प्रश्न आंबेडकरांनी विचारला आहे. आंबेडकरांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे शिवसैनिकांमध्येही नेमकं कोणासोबत जावे, याबाबत संभ्रम आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे ?
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 23, 2022
विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंनी बंडाचे निशाण फडकवले आहे. शिवसेनेची मते फुटल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी थेट सुरत गाठल्याने राजकीय भूकंप झाला. त्यामुळे त्यांच्यासोबत कोण आणि ठाकरेंसोबत कोण, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतु, अद्यापही राज्यातील काही शिवसैनिकांमध्ये संभ्रम आहे. शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांचं ट्विट सध्या चर्चेत आहे 'सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजू गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू,' असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. 'माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या वनवासात कायम राहील. शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे. आपले मत शिवसेनेला कायम राहील. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल,' असंही त्यांनी म्हटलं आहे.
सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू. @CMOMaharashtra @mieknathshinde
— Deepali Sayed (@deepalisayed) June 23, 2022
टिप्पणी पोस्ट करा